मुंबई महापौर कबड्डी स्पर्धा २०१८ – महात्मा फुले स्पोर्टस अकादमी आणि महिंद्र अँण्ड महिंद्र संघ ठरले विजेते.
नेहरु नगर, कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चार दिवस रंगलेली ‘मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा २०१८’ ची सांगता काल झाली. महिला आणि पुरुष विभागात अनुक्रमे १६-१६ संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महात्मा गांधी स्पोर्टस अकादमी (उपनगर), विश्वशांती (पालघर), कर्नाळा स्पोर्टस क्लब (रायगड), स्वराज्य स्पोर्टस क्लब (उपनगर), शिवशक्ती (मुंबई शहर), टागोर नगर मित्रमंडळ (उपनगर), शिवओम स्पो. (पुणे), चिपळूण स्पो. अकादमी (रत्नागिरी), एम.एच. स्पो. क्लब (पुणे), संघर्ष कीडा मंडळ (उपनगर), अनिकेत स्पो. क्लब खेड (रत्नागिरी), अमरहिंद मंडळ (मुंबई शहर), सुवर्ण युग (पुणे), मुंबई पोलिस (मुंबई शहर), महात्मा फुले स्पो. (उपनगर), नवशक्ती क्रीडा मंडळ (उपनगर) हे महिला गटाचे संघ तर मध्य रेल्वे, युनियन बँक, सेंट्रल बँक, किंग्ज बिल्डर्स, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलिस, माझगाव डॉक, आर. के. इंजिनिअरींग, महिंद्र आणि महिंद्र, मुंबई महानगरपालिका, मुंबई बंदर, बीईएसटी, देना बँक, मुंबई अग्निशमन दल, महाराष्ट्र पोलिस, जे. जे. हॉस्पीटल या व्यावसायिक पुरुष गटाच्या संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने झाले. उपांत्य फेरीत महिलांच्या गटात महात्मा गांधी, संघर्ष गोरेगाव, शिवशक्ती आणि मुंबई पोलिस तर पुरुषांच्या गटात देना बँक, महिंद्र आणि महिंद्र, मुंबई बंदर आणि महाराष्ट्र पोलिस या संघानी प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत प्रवेश केलेले सर्वच संघ तुल्यबळ होते. उपउपांत्य फेरीत भारत पेट्रोलियमचा धक्कादायक पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या मुंबई बंदरची महाराष्ट्र पोलिससमोर डाळ शिजली नाही. देना बँकेची उपांत्य फेरीत महिंद्र आणि महिंद्रशी लढत झाली यात महिंद्र आणि महिंद्रने सहज सामना खिशात घालता आला. महिलांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत मुंबई उपनगरचे दोन बलाढ्य संघ महात्मा गांधी स्पोर्टस अकादमी आणि संघर्ष गोरेगाव यांच्यात झाली. या दोन्ही संघात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या कोमल देवकर आणि तेजस्वीनी पाटेकर तसेच रेल्वेकडून राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या मिनल जाधव आणि पुजा किणी या दर्जेदार खेळाडू खेळत होत्या. कोमल देवकरवर पुर्ण भिस्त असलेल्या संघर्ष गोरेगाव संघ महात्मा गांधीसमोर टिकाव धरु शकला नाही आणि संघर्ष गोरेगावचे अंतिम फेरीचे स्वप्न भंग झाले. इकडे दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सतत दर्जेदार कामगिरी करणारे मुंबई शहरचे शिवशक्ती आणि मुंबई पोलिस हे एकमेकांना भिडले होते. शिवशक्तीच्या जोरदार चढायांनी मुंबई पोलिस संघ बिथरला आणि त्यांचेही अंतिम फेरीचे स्वप्न भंग झाले.
अंतिम फेरीच्या सामन्यात महात्मा गांधी विरुध्द शिवशक्ती हा सामना जवळपास राज्यस्तरावरील मुंबई उपनगर विरुध्द मुंबई शहर असाच होता. या सामन्याच्या सुरुवातीपासून पुजा किणीच्या जोरदार चढाया आणि डाव्या-उजव्या कोपऱ्याच्या समतोल बचावाने शिवशक्तीला नामोहरण केले व सुरुवातीपासूनच महात्मा गांधी आघाडीवर राहिला. मध्यंतरानंतर शिवशक्तीने सामन्यावर पकड मिळवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला पण महात्मा गांधी संघाने तोपर्यंत सामन्यात चांगलीच आघाडी मिळवली होती. पुरुषांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र पोलिसचा संघ महिंद्र आणि महिंद्र संघाशी भिडला होता. ही लढत अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत गुणफलक दोन्ही संघांच्या बाजूने झुकत असतानाच अगदी शेवटची पाच मिनीटं शिल्लक असताना महाराष्ट्र पोलिसांच्या केलेल्या चुकांमुळे महिंद्र आणि महिंद्रकडे विजयी आघाडी आली होती. शेवटच्या मिनीटात महाराष्ट्र पोलिसांनी सामन्यात परतण्याचा कसोशीने प्रयत्न केला परंतु तोपर्यंत वेळ टळून गेली होती आणि शेवटच्या क्षणी महिंद्र आणि महिंद्रने महाराष्ट्र पोलिसवर ४ गुणांनी विजय मिळवून मुंबई महापौर चषकावर नाव कोरले.
महिला आणि पुऱुषांच्या गटात विजयी झालेल्या दोन्ही संघांनी संपुर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी आणि ताळमेळ साधून त्यांच्या संघांना विजेतपदाचे मुकूट मिळवून देण्यात यश मिळवले. स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचेही मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनकडून कौतुक करण्यात आले त्यात पुरुषांच्या गटात सर्वोत्तम चढाईपटूचा बहुमान सुहास वगरे (महिंद्रा अॅन्ड महिंद्रा) सर्वोत्तम बचावपटू नामदेव इस्वलकर (महाराष्ट्र पोलीस) तर स्पर्धेतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा बहुमान आनंदा पाटील (महिंद्रा अॅन्ड महिंद्रा) यांना मिळाला. महिलांच्या गटातून सर्वोत्तम चढाईपटूचा बहुमान पूजा केणी (महात्मा गांधी स्पो. अकॅडमी), सर्वोत्तम बचावपटू श्रुती चाळके (महात्मा गांधी स्पो. अकॅडमी) तर सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान रेल्वेकडून खेळणारी रेखा सावंत (शिवशक्ती क्रीडा मंडळ) यांना मिळाला.
मुंबई महापौर चषक स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाला मुंबईचे महापौर प्रिन्सीपल विश्वनाथ महाडेश्वर, कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर, युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष सान्वी तांडेल, स्थानिक नगरसेविका प्रविणा मोरजकर, शिवसेनेचे स्थानिक विभागातील शिवसैनिक, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.